harshalआज सकाळी-सकाळी जेव्हा whatsApp पहिले तर माझ्या विद्यार्थांच्या गटात अनेक पोस्ट असल्याचे पहिले, मनात आले रात्री बरंच काही घडलेले दिसते.. पाहिले तर धक्कादायक बातमी वाचली. माझा विद्यार्थी हर्षल खैरमोडे आता या जगात नाही. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. प्रथमतः विश्वासच बसत नव्हता. परंतु ती बातमी खरी असल्याचे इतर गटात पाहिल्यावर कळले. अतिशय उत्साही व सदा हसमुख असणारा, नृत्यात प्राविण्य असणारा हर्षल नाही. हर्षल धुल्यातीच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नृत्य शिक्षक होता. मुलांमध्ये प्रिय होता. जयेंद्र पिठोडीया याचेशी सविस्तर बोलल्यावर कळले ते असे की.. शहाद्याला एका शाळेत नृत्य परीक्षक म्हणून तो गेला होता. जातांनाही त्याला असिडीटी चा त्रास जाणवत होता. परंतु नृत्य त्याचा जीव की प्राण. त्या कडे दुर्लक्ष करून तो गेला. तेथे त्याने नृत्य देखील सादर केले. कार्यक्रमादरम्यान त्याला छातीत दुखायला लागले म्हणून तो सहकार्याला सांगून एका खोलीत आराम करतो असे सांगून गेला. सोबत  कुणीही नव्हते. एखाद-दीड तासांनंतर जेव्हा त्याचा सहकारी खोलीत गेला तर शरीर अर्धे पलंगावर तर अर्धे खाली. लगेच शहद्याला इस्पितळात दाखल केले. प्रयत्न करूनही डॉक्टर वाचवू शकले नाहीत.

इतक्या कमी वयात ( जवळपास २८-३० वर्ष ) हृदय विकाराने मृत्यू येणे विचार करायला लावणारी गोष्ट आहे. सध्या प्रत्येक व्यक्ती इतका धाव-धाव धावतोय कि आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीये. भौतिक गोष्टींचे आकर्षण वाढलेले. त्यासाठी पैसा मिळवणे व मग जीवघेणे धावणे. पूर्वी शारीरिक व्यायाम वैयक्तिक जीवन निवांत क्षण मिळत होते.. कारण अशी स्पर्धा नव्हती.

प्रत्येकाने आपल्या दिवसाचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यात व्यायाम तसेच स्वतः साठी वेळ देणे फार गरजेचे वाटते.. तसे सकारात्मक पाऊल निदान या घटनेतून आपण घेणार का?

माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना, सहकार्यांना तसेच प्रियजनांना आवाहन आहे की आपल्या आरोग्याकडे जाणीव पूर्वक लक्ष द्या..

आपलाच

नंदकिशोर बागुल